प्रवाशांनी फिरवली पाठ : एसटीला आर्थिक फटका
राजूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू झाल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहे. जिल्ह्यांतर्गत व परजिल्ह्यात चालू असलेली बससेवा बंद केल्याने एसटी महामंडळास मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. प्रवासीही बसने प्रवास करणे टाळत आहेत. भोकरदन तालुक्यातील राजूर येथील बसस्थानक प्रवासी, विद्यार्थी व भाविकांनी नेहमीच गजबजलेले असते. परंतु, संचारबंदीमुळे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने बसस्थानकात शुकशुकाट दिसत आहे.
राजूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. प्रवाशांच्या सोयीनुसार बससेवाही सुरू आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व महिला एसटी बसेसने प्रवास करणे पसंत करतात. त्यासाठी महामंडळाने नांदेड, भुसावळ, मुक्ताईनगर, जळगाव, सोलापूर, लातूर, परळी, औरंगाबाद या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु केल्याने भाविकांना राजूरला येणे सहज शक्य होते. कोरोनामुळे बससेवा बंद झाल्याने भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. त्याचप्रमाणे नळणी, हसनाबाद-दाभाडी जवखेडा, निवडुंगा, आसरखेडा यासारख्या ग्रामीण भागातील बस बंद झाल्या आहेत. या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात व्यवसाय व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी राजूरला येतात. परंतु, लॉकडाऊनमुळे ही संख्या देखील कमी झाली आहे. राजूरमध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था असल्याने परिसरातील विद्यार्थी शाळा, महाविद्यालय व क्लासेसमध्ये शिक्षण घेतात. बसमध्ये पासची सवलत असल्याने विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरते. राजूरचे बसस्थानक नेहमीच विद्यार्थ्यांनी गजबजलेले असते. परंतु, सध्या कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने व शाळा, महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थीही फिरकत नाही. बसस्थानक सुनसान वाटत आहे. संचारबंदीमुळे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने एसटीला आर्थिक फटका बसत आहे.
लॉकडाऊनमुळे प्रवासी मिळत नसल्याने वाहतूक खर्चही वसूल होत नाही. २०-२५ प्रवासी असतील तरच बस बाहेर काढणे परवडते. सध्या प्रवासी घरीच आहेत. ग्रामीण व परजिल्ह्यातील बससेवा तूर्तास बंद आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा सुरू आहे.
व्ही. पी. पवार, वाहतूक नियंत्रक, राजूर