लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : एरवी पावसाळ्याच्या प्रारंभी ग्रामीण भागात दिसणारी काळीभोर टपोरी जांभळं यावर्षी शोधूनही सापडेनात. दरम्यान दुष्काळमुळे यावर्षी जांभळांना पाहिजे तसा बहर न आल्याने क्वचित ठिकाणीच ही जांभळं नजरी पडत आहेत. यामुळे यावर्षी जांभूळ शौकिनांची निराशा होणार असल्याचे बोलले जात आहे.आंब्यांचा हंगाम संपला की ग्रामीण भागात जांभळांचा हंगाम सुरू होतो. यावर्षी मात्र, उन्हाचा पारा तापल्याने जांभळीला पाहिजे तसा मोहर लगडला नाही. त्यातच मोहराची गळही मोठ्या प्रमाणावर झाल्याने फार कमी जांभळंं हाती पडणार आहेत. सोमवारी टेंभुर्णीच्या साप्ताहिक बाजारात फक्त टोपलभर जांभळं तेवढी विक्रीसाठी आल्याचे दिसले. त्यातही अर्धीअधिक जांभळे कच्चीच दिसली.सध्या बाजारात जांभळं २०० रू. किलो विकली जात आहेत. मधुमेहावर गुणकारी असल्याने या दिवसांत शहरापासून खेड्यापर्यंत जांभळांना मोठी मागणी असते.सध्या वाढत्या वृक्षतोडीमुळे ओढ्या- नाल्यातून दिसणाऱ्या जांभळीच्या ताट्याही कमी झाल्या आहेत. असे असले तरी अद्याप पूर्ण जांभळाचा हंगाम संपला नसल्याने किमती कमी होतील, असे दिसते.
दुष्काळाने जांभळाचे उत्पादन घटले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:28 AM