बदनापूर : देशातील अनेक राज्यांत परिवर्तन होत आहे. भाजपला पराभवाची भीती वाटत आहे. त्यामुळेच भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बदनापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात गुरुवारी केला.
पुढे बोलताना आमदार पवार म्हणाले की, राज्याची अस्मिता टिकविण्यासाठी शरद पवार हे सत्तेत गेले नाही. त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडला. आम्ही त्यांच्याबरोबरच राहिलो. २०१९ला ते राज्यात एकटे फिरले. त्यावेळी राज्यात काय घडले हे आपण सर्वांनी बघितले. बावीस हजार कोटी रुपयांचा कापूस घरात पडल्याबाबत आपण अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे आजही पंधरा हजार कोटी रुपयांचा कापूस घरात पडलेला आहे. आता त्या शेतकऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी २०२२चा विमा व अतिवृष्टीचे अनुदान तत्काळ देण्याची मागणी यावेळी केली.
याप्रसंगी माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, बबलू चौधरी, पंकज बोराडे, संजय काळबांडे, तालुकाध्यक्ष राम शिरसाट, शेख मतीन, परमेश्वर नाईकवाडे, शहराध्यक्ष श्रीमंत जराड, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जगताप, नगरसेवक शेख इमरान, विनोद साबळे, शेख मुजीब, फिरोज खान पठाण, सरपंच गौतम खिल्लारे, खंडू काळवणे, बाळासाहेब वैद्य, शरद कोळकर, पी. एन. वाळके, विलास झुंबड आदींची उपस्थिती होती.