हसनाबाद : भाेकरदन तालुक्यात पावसाची ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती आहे. काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस पडला असला तरी काही गावांमध्ये अपुऱ्या पावसामुळे पिकांना फटका बसत आहे. तालुक्यातील वालसा खालसा येथील शेतकरी दीपक जाधव यांची फूल शेती कमी पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. फुलशेतीला विमा कवच नसल्याने सरकारने मदत करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे.
नगदी पीक म्हणून फुलशेतीकडे पाहण्यात येते. मागील चार वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने फुलशेती बहरली होती. मात्र, यावर्षी कमी पावसामुळे फुलशेतीत लावलेला खर्च निघणे अवघड झाले आहे. भोकरदन जवळील वालसा खालसा येथील तरुण शेतकरी दीपक सुभाष जाधव यांची गट नंबर १८८ मध्ये ३ एकर शेती आहे. ते दोन एकर शेतीवर फुलशेती करतात. मात्र, समाधानकारक पावसाअभावी फुलझाडे सुकून गेली आहेत.
दहा वर्षांपासून फुलशेतीदीपक जाधव हे दहा वर्षांपासून फुलशेती करतात. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून देखील नोकरी न मिळाल्याने त्यांनी दोन एकरावर फुलशेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात तीस हजार रुपये खर्च केले. यात गलांडा, गुलाब, झेंडू या फुलांची लागवड केली. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने त्यांनी डोक्यावर पाणी वाहून रोपे जगवली. मात्र, जुलै महिना संपायला आला तरी, पावसाने हजेरी न लावल्यामुळे तसेच खराब वातावरणामुळे रोपांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. धुके व जोराचा पाऊस नसल्यामुळे संपूर्ण झाडे वाळून गेली आहेत.
दीड लाखांचे उत्पन्न अपेक्षितयावर्षी दीपक जाधव यांना फुलशेतीतून जवळपास दीड लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. कुटुंबातील आई, वडील व तीन भाऊ हे कुटुंब यावरच उपजीविका करतात. शेतातून काढलेली फुले सिल्लोड, भोकरदन, राजुरी, चिखली, जालना येथे जाऊन विकतात. दीपक जाधव हे हसनाबाद येथे घरोघरी जाऊन फुलांच्या माळा विकून उदरनिर्वाह करतात. मात्र, फुलशेती उद्ध्वस्त झाल्याने जाधव कुटुंब हवालदिल झाले आहे. या व्यवसायाला विमा कवच नसल्याने सरकारी अनुदान मिळत नाही. त्यातच आता निसर्गाने साथ न दिल्याने जाधव कुटुंबावर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.