जालना : ऑगस्ट महिन्याच्या मध्यावधीपर्यंतही जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडेठाक असून, प्रकल्पांमध्येही पाण्याचा ठणठणाट आहे. परिणामी ग्रामीण भागातील पाणीटंचाई कायम असून, होणारी मागणी पाहता प्रशासनाकडून १०९ टँकरला ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
निम्मा पावसाळा संपला तरी जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. एकीकडे नदी, ओढे, नाले आणि प्रकल्पांतही पाण्याचा ठणठणाट आहे. परंतु, प्रशासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात तब्बल ७१.४१ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. एकीकडे रिमझिम पावसावर खरिपातील पिके तगली आहेत. परंतु, दुसरीकडे ग्रामीण, शहरी भागातील पाणीटंचाईच्या झळा आजही कायम आहेत. मुदत संपल्याने प्रशासनाकडून टँकरही बंद करण्यात आले होते. परंतु, प्रकल्पांतच पाणी नाही तर पाणीपुरवठा योजना सुरू होणार कशा, असा प्रश्न आहे. त्यामुळे टँकर पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी गावा-गावांतून होत होती. ही बाब विचारात घेता जिल्हा प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून, ऑगस्ट अखेरपर्यंत तरी संबंधित गावांतील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
भोकरदनमध्ये टँकरचा आधारभोकरदन शहरातील पाणीटंचाई आजही भीषण आहे. शहरासाठी २५ टँकर पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत. शिवाय तालुक्यातील १८ गावे आणि एका वाडीसाठी २३ टँकर सुरू करण्यात आले आहेत. अंबड तालुक्यातील १३ गावांसाठी १७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
एक लाख लोकांची तहान टँकरवरभर पावसाळ्यातही जालना जिल्ह्यात पाणीटंचाई कायम आहे. भोकरदन शहरासह ३२ गावे आणि एका वाडीवरील एक लाख एक हजार २८४ नागरिकांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यासाठी सद्य:स्थितीत ६५ टँकर सुरू आहेत. त्याशिवाय बदनापूर तालुक्यात २३ आणि जालना तालुक्यात २१ टँकर सुरू करण्यासही हिरवा कंदील मिळाला आहे.
जिल्ह्यात अशी आहे पावसाची नोंदतालुका- टक्केवारीजालना- ७१.३६बदनापूर- ६७.३६भोकरदन- ७५.१५जाफराबाद- ७२.०२परतूर- ७७.५२मंठा- ७३.१२अंबड- ६२.९५घनसावंगी- ६५.१९एकूण- ७१.४०