- राहुल वरशिळजालना : जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांवर मोठा आघात झाला. काही पाल्यांचे आई-वडील असे दोन्ही छत्र हरवले, तर काहींनी घराचा एकमेव आधार असलेले वडील गमावले. अशीच एक घटना बदनापूर तालुक्यातील चनेगाव येथेही घडली होती. यात २०२०मध्ये घरातील कर्ता पुरुष वडील बाळू तायडे (वय ४५) गेल्याने सात मुले व पत्नी पाेरकी झाली होती. त्या दु:खातून कसेबसे सावरत नाही तोच गुरुवारी सायंकाळी जालना - राजूर रोडवर झालेल्या अपघात पत्नी नंदाबाई बाळू तायडेे (वय ४०) यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे आता सातही मुले कायमची पोरकी झाली आहेत. काळाने गुरुवारी घाला घातल्याने एकाच गावातील पाच जणांचा मृत्यू झाला असून, गावावर दु:खाचा डोंगर काेसळल्याने एकही चूल पेटली नाही.
नंदाबाई तायडे यांचे जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण माहेर असून, २००२ मध्ये चनेगाव येथील बाळू तायडे यांच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर त्यांचा सुखी संसार सुरू होता. यादरम्यान या दाम्पत्याला पाच मुली व दोन मुलगे झाले. या सर्व मुलांचे शिक्षण दोघे पत्नी-पत्नी आनंदाने ऊसतोड आणि मजुरी करून करीत होते. हे दाम्पत्य सुखी संसाराचा गाडा हाकत होते. परंतु, कोरोनाकाळात वडील बाळू तायडे यांच्यावर काळाने घाला घातला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आई नंदाबाई यांनी पाचपैकी दोन मुलींचे लग्न केले आहे, तर इतर पाच जणांचे शिक्षण सुरू आहे.
खासदारांनी उचलली पुढील शिक्षणाची जबाबदारीबदनापूर येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात एक मुलगी इयत्ता बारावी, दुसरी आठवीमध्ये आणि तिसरी मुलगी जालना येथे दहावीमध्ये शिकत आहे. तर एक मुलगा पाचवी आणि सर्वांत लहान तिसरीच्या वर्गात आहे. आता या मुलांच्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च खासदार डॉ. कल्याण काळे करणार असल्याचे त्यांनी स्वत: अंत्यसंस्काराला उपस्थित राहून जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे गजानन गीते यांनीही आपल्या संस्थेमध्ये बारावीपर्यंत मोफत शिक्षण देणार असल्याचे सांगितले.
आता आम्ही कुणाला मम्मी म्हणावंजालना - राजूर रोडवर गुरुवारी झालेल्या अपघातात एकाच गावातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली होती. या पाचही मृतदेहांवर शुक्रवारी सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी गावात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यात नंदाबाई तायडे यांच्यावर अंत्यसंस्कार करत असताना त्यांची सातही मुले आता आम्ही कुणाला मम्मी म्हणावं... अस म्हणून टाहो फोडत होती. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी उपस्थित झालेल्या सर्व महिलांसह नागरिकांनाही गहिवरून आले.
नंदाबाईंच्या मुलांना अकरा लाखांची मदतगुरुवारी झालेल्या अपघातात नंदाबाई तायडे यांचा मृत्यू झाल्याने त्यांची सात मुले पोरकी झाली. त्यामुळे शुक्रवारी अंत्यसंस्काराला उपस्थित असलेले खासदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार संतोष सांबरे, भाजपचे जालना विधानसभाप्रमुख भास्कर दानवे, उध्दवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी प्रत्येकी एक लाख आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख अशी एकूण ११ लाखांची मदत जाहीर करून सर्वांनी त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे.