जालना : २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षेस जालन्याचे तत्कालीन डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी डमी विद्यार्थी बसवून परीक्षा दिली होती. या प्रकरणी खिरडकर व विद्यार्थी म्हणून बसलेले पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ मंडलिक यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे पत्र परीक्षा व मूल्यमापन मंडळाने कदीम जालना पोलिसांना दिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ऑक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये विधि अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली होती. जालना येथील सावित्रीबाई फुले कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयात या परीक्षेचे केंद्र होते. या परीक्षा केंद्रावर विधि अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी जालन्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर यांनी त्यांच्या जागी डमी विद्यार्थी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ शहादेव मंडलिक यांना बसवून पेपर दिल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
या प्रकरणी कुलगुरू यांच्या आदेशाने व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. विलास खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीने चौकशी करून डीवायएसपी सुधीर खिरडकर व डमी विद्यार्थी सोमनाथ मंडलिक यांना दोषी ठरविले आहे. समितीने सादर केलेला अहवाल परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या ९ मे २०२२ रोजी झालेल्या बैठकीत स्वीकारण्यात आला आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी कदीम पोलिसांना खिरडकर व पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ मंडलिक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबतचे पत्र ४ जून रोजी पाठविले आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली.
लाचेनंतर मारहाणीच्या प्रकरणातही अडकले होते खिरडकरएका आरोपीचे गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने लाच स्वीकारली होती. त्यानंतर त्यांनी एका इसमास जबर मारहाण केली होती. ही दोन्ही प्रकरणे राज्यभरात चांगलीच गाजली होती. त्यात आता डमी विद्यार्थ्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.