सहशिक्षक मैसनवाड यांनी राबवलेल्या एक मित्र एक वृक्ष उपक्रमाला प्रतिसाद
परतूर : तालुक्यातील दहिफळ भोंगाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अकराशे झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी एक मित्र एक वृक्ष या उपक्रमांतर्गत मिळालेल्या वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी खरात यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.
सहशिक्षक मैसनवाड यांनी राबवलेल्या एक मित्र एक वृक्ष या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातील मित्रांनी तब्बल दहा हजार रुपयांची देणगी पाठवलेली होती. त्या देणगीतून दुसऱ्या टप्प्यातील दोनशे फळझाडे मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी दातखीळ यांनी शाळा हीच आपल्या मुलांचे भवितव्य ठरवणारी वास्तू असते. त्याबरोबर या ठिकाणाला तुम्ही स्वर्ग बनवलात, नक्कीच या शाळेतून घडणारी मुले भविष्यात क्रांती घडल्याशिवाय राहणार नाहीत व उच्च पदावर जाऊन या गावाचे नाव मोठे करतील. तुमच्या सहभागाविषयी असे वाटते की, तुम्हाला मुलांचे शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावे, अशी तुमची भूमिका दिसून येते. या भूमिकेला जोडून मी तुम्हाला असे आश्वासित करतो की, जिल्हा परिषदेमार्फत काहीही मदत लागेल ती मी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन, असे सांगितले. यावेळी नेर बिटचे शिक्षणविस्तार अधिकारी बाबूराव पवार, कल्याण बागल, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे गाडेकर, संतोष देशपांडे उपस्थित होते.
फोटो
शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी खरात यांच्या हस्ते केक कापण्यात आला.