लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एका महिलेविरूध्द कदीम पोलिसांनी कारवाई करून ७ लाख ९३ हजार ४०० रूपयांचा १५ किलो ८६८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. ही कारवाई सोमवारी दुपारी शहरातील बँक सहकारी कॉलनी परिसरात करण्यात आली असून, एका महिलेविरूध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एक महिला गांजा घेऊन जात असल्याची माहिती कदीम पोलीस ठाण्याचे पोनि देविदास शेळके यांना मिळाली होती. या माहितीवरून ठाण्यातील डीबी (गुन्हेगार शोध) पथकाने सोमवारी दुपारी शहरातील बँक सहकार कॉलनी येथे सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले. महिलेची विचारणा केली असता तिने शांताबाई बबन जाधव (रा. जालना) असे नाव सांगितले. यावेळी उपस्थित फॉरेन्सिक सपोर्ट युनिटमधील सहकाऱ्यांनी गांजाची तपासणी करून प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला. त्यानंतर पंचासमक्ष गांजाचे वजन केले असता तो १५ किलो ८६८ ग्रॅम वजनाचा भरून आला. प्रति ५० हजार रूपये किलो प्रमाणे एकूण ७ लाख ९३ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधित महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, सहायक पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि देविदास शेळके, सपोनि देविदास सोनवळे, सपोनि निशा बनसोड, पोना कृष्णा चव्हाण, पोना गणेश जाधव, पोकॉ रमेश काळे, पोकॉ विठ्ठल खर्डे, पोकॉ मेघा नागलोत, पोकॉ प्रताप जोनवाल, रवी खलसे आदींनी केली.कदीम पोलिसांनी कारवाईकरून बॅग व पिशवीची तपासणी केली असता आतमध्ये आठ पिशव्यांमध्ये ओलसार १५ किलो गांजा आढळून आला. फॉरेन्सिक सपोर्ट युनिटमधील सहकाऱ्यांनी गांजाची तपासणी केली. गांजा कोठून आणला, याची चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात आले.एक दिवसाची कोठडीया प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या महिलेला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने संबंधित महिलेला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सपोनि देविदास सोनवळे हे करीत आहेत.
आठ लाख रुपयांचा १५ किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 1:12 AM