टेंभुर्णी : ग्रामपंचायतीची निवडणूक ऐन संक्रांतीच्या दिवशी होत असल्याने संक्रांतीच्या दिवशी निवडणुकीच्या कर्तव्यावर असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे बूथ गाठावे लागणार आहे. त्यातच या निवडणुकीसाठी शिक्षिकांसह अनेक महिला कर्मचाऱ्यांची ड्युटी लागल्याने ऐन संक्रांतीच्या दिवशी घराबाहेर पडावे लागत असल्याने त्यांच्यातून नाराजीचा सूर ऐकू येत आहे.
पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या १५ जानेवारी रोजी होत आहे. त्यातच महिलांसाठी महत्त्वाचा असणारा सण मकर संक्रांत १४ जानेवारी रोजी येत असल्याने हा सण कुठे साजरा करावा, असा प्रश्न महिला कर्मचाऱ्यांना पडला आहे. १५ जानेवारी रोजी निवडणुका होत असल्याने निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना १४ तारखेला सकाळीच निवडणूक साहित्य घेण्यासाठी तहसील कार्यालयात उपस्थित रहावे लागणार आहे. त्यानंतर तेथून सर्व कर्मचाऱ्यांना याच दिवशी आपले निवडणुकीचे बूथ गाठावे लागणार आहे. यात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याने त्यांच्यातून नाराजीचा सूर निघत आहे. दरम्यान, महिला कर्मचाऱ्यांना १४ तारखेला सवलत देऊन त्यांना १५ जानेवारीला परस्पर कर्तव्यावर बोलवावे, अशी मागणी महिला कर्मचाऱ्यांतून होत आहे.
चौकट
संक्रांतीचा सण महिलांसाठी खूप महत्त्वाचा असून, या दिवशी महिलांना दिवसभर घरी स्वयंपाक करणे, वाण देणे आदी कामात व्यस्त रहावे लागते. आतापर्यंत कोणतीही निवडणूक अशाप्रकारे सणाच्या दिवसात झालेली नाही. मात्र ही निवडणूक संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असल्याने आम्हा कर्मचाऱ्यांना ऐन संक्रांतीच्या दिवशी कर्तव्यावर जावे लागणार आहे. महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या गावाजवळ निवडणुकीचे कर्तव्य देऊन संक्रांतीच्या दिवशी कामातून सवलत द्यावी. त्यांना मतदानाच्या दिवशी परस्पर मतदान स्थळी येण्याची मुभा तरी प्रशासनाने द्यावी.
सुखदा काळे, शिक्षिका, टेंभुर्णी.