देऊळगाव राजा : देऊळगाव राजा उपविभागामध्ये वीज वितरण कंपनीचे चक्क ग्राहकांकडे ३० कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकीत वीज ग्राहकांनी वेळीच वीज बिलाचा भरणा करावा, असे आवाहन वीज वितरण कंपनीचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता योगेश बढिये यांनी केले आहे.
देऊळगाव राजा उपविभागामध्ये एकूण ३६ हजार ग्राहक आहेत. यामध्ये कृषिपंप १६ हजार ग्राहक आहेत. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ग्राहकांची संख्या ४०० असून, घरगुती वीज ग्राहक १६ हजार ५०० तर वाणिज्य ग्राहकांची संख्या २ हजारांवर आहे. यामध्ये शासकीय- निमशासकीय कार्यालयांची संख्या १४५ आहेत. विशेषत: यात पोलीस ठाणे दोन लाख रुपये, ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा यांच्याकडे दीड लाख रुपये, नगर परिषदेकडे पथदिवे पाच लाख, पाणीपुरवठा ३ लाख, खडकपूर्णा धरणावरील पंप हाऊस यांच्याकडे थकीत ११ लाख रुपये आहेत.
लॉकडाऊन काळामध्ये महावितरण कंपनीला वसुलीदरम्यान शासकीय कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारे सकारात्मक सहकार्य तसेच थकबाकीपोटी रक्कम मिळाली नाही, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे प्रभारी उपकार्यकारी अभियंत्यांनी दिली. याच बरोबर ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींतर्गत पाणीपुरवठा यांच्याकडे १ कोटी रुपये तर पथदिवे ४५ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. जानेवारी महिन्यात वीजचोरीच्या माध्यमातून देऊळगाव राजा तथा सिंदखेड राजा उपविभागातून १२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
चौकट
कोरोनाच्या काळामध्ये अधिकचे बिल आल्याचा ग्राहकांचा समज आहे; परंतु कुठल्याही प्रकारचे वीज बिल वाढीव आलेले नाही. नियमानुसार प्रत्येक ग्राहकांना बिले देण्यात आलेली आहेत, अशीही माहिती बढिये यांनी दिली.