- अशोक डोरलेअंबड ( जालना): शहरातील धाईतनगर परिसरातील १०० एकर मैदानावर शुक्रवारी ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा होणार आहे. नेतेमंडळींच्या प्रमुख उपस्थिती होणाऱ्या या सभेसाठी लाखोच्या संख्येने ओबीसी समाज बांधव येणार असल्याने ठिकठिकाणी पाणी, अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. शिवाय वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, रासपचे महादेव जानकर, शब्बीर अन्सारी, आमदार गोपीचंद पडळकर यांची या सभेस प्रमुख उपस्थिती राहणार असून, सभेच्या निमित्ताने राज्यातील ओबीसी आपली एकजूट दाखवणार आहे. ही सभा मोठी होणार असल्याने छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सभास्थळाला भेट देवून आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी समन्वयक उपस्थित होते. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत पोलीस बंदोबस्ता विषयी माहिती दिली.
पोलिसांचा तगडा बंदोबस्तया सभेदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी १२०० पोलिस कर्मचारी अधिकारी, २०० अधिकारी, कर्मचारी इतर जिल्ह्यातील राहणार आहेत. एसआरपीएफच्या तीन कंपन्या, रॅपीड ॲक्शन फोर्सचीएक कंपनी, क्विक ॲक्शन टीम, ९ स्ट्रायकिंग फोर्स बंदोबस्ताचे काम पाहणार आहे.
वाहन पार्किंगसाठी पाच ठिकाणी व्यवस्थासभेला अनेकजण खासगी वाहने करून येणार आहेत. ही वाहने पार्किंग करण्यासाठी पाच ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. यात पाचोड रोड वर राम लांडे यांचे शेत, भालचंद्र रेसिडेन्सी, ओम शांती विद्यालय, दत्ताजी भाले विदयालय तसेच जालना मार्गावर फेडरेशन मैदानावर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. घनसावंगी रोड ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे
व्हाटस्ॲप ॲडमिनलाही सूचनाअंबड येथील सभेच्या पार्श्वभूमीवर पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. कोणी व्हाटस्ॲपवर भडकावू संदेश पाठवित असतील तर अशा पोस्ट ॲडमिनने डिलिट कराव्यात किंवा संबंधितांची माहिती पोलिसांना द्यावी, अशी सूचना ग्रुप ॲडमिनला दिली आहे. सभास्थळी येणाऱ्यांनीही आचार संहितेचे पालन करावे.- शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक, जालना
या आहेत मागण्या:१. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये.२. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जात निहाय जनगनना करण्यात यावी.३. मराठा समाजाला देण्यात आलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी.४. खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी.५. ७ सप्टेंबर २०२३ रोजी कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी शासनाने काढलेला जी. आर ताबडतोब रद्द करावा.६. बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन तात्काळ एसटी चे दाखले वाटप करण्यात यावे.७. धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची (एसटी) अंमलबजावणी करण्यात यावी अशा आदी मागण्यांचा समावेश आहे.