जालना : खातेदाराच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून लाखो रुपये लंपास करणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला सदर बाजार पोलिसांनी अटक केली. ज्ञानेश्वर चंद्रभान चव्हाण (रा. कुंभेफळ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून रोख रक्कम ८ लाख २१ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.१८ डिसेंबर २०२१ रोजी जुना मोंढा येथील बँक महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक मधुकर जनार्दन साळवे (५४) यांनी फिर्याद दिली की, पेन्शनधारक खातेदार रमाकांत सुंदरलाल घोरपडे यांच्या खात्यात १२ लाख रुपये होते; परंतु त्यांच्या खात्यात सध्या केवळ १ लाख ४ हजार ९६४ रुपयेच शिल्लक राहिले असून, कोणीतरी हे पैसे काढून घेतल्याची तक्रार त्यांनी दिली होती.
सपोनि ज्ञानेश्वर पायघन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख राजेंद्र वाघ व त्यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास केला. बँकेतील कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता, बँकेतीलच एका कर्मचाऱ्याने खोट्या स्वाक्षऱ्या करून लुज चेक घेतला. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीच्या बनावट स्वाक्षऱ्या करून खातेदाराच्या खात्यातून ११ लाख रुपये काढल्याचे समजले. पोलिसांनी तपास करून बँकेचा व्यावसायिक प्रतिनिधी (बीसी) ज्ञानेश्वर चंद्रभान चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता, त्याने सदरील गुन्हा संशयित जावेद करीम शेख (रा. लोहार मोहल्ला, जालना) याच्यासह गेल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम ८ लाख २१ हजार रुपये हस्तगत करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. ज्ञानेश्वर पायघन, गुन्हे शोध पथक प्रमुख राजेंद्र वाघ, पोलीस अमलदार रामप्रसाद रंगे, सुभाष पवार, समाधान तेलंग्रे, धनाजी कावळे, रामेश्वर जाधव, जगन्नाथ जाधव, सोमनाथ उबाळे, दीपक घुगे, भरत डाकणे, योगेश पठाडे, सुमित्रा अभोरे यांनी केली.