लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्याला उद्योगामुळे वेगळी ओळख निर्माण झाली असून, अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. येथील उद्योगांच्या भरभराटीसाठी कायम प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.औद्योगिक वसाहतीमधील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण गुुरुवारी राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भास्करराव आंबेकर, माजी आ. संतोष सांबरे, ए. जे. बोराडे, किशोर अग्रवाल, कैलास लोया, घनश्याम गोयल, सुभाष अजमेरा, सुनील रायठठ्ठा, विजय मित्तल, अनिल तलरेजा, ओमप्रकाश पंच, अर्जुन गेही, पंडित भुतेकर, पांडुरंग डोंगरे, संतोष मोहिते, विष्णू पाचफुले, आत्मानंद भगत, मुख्य अभियंता सुभाष तुपे, प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ, कार्यकारी अभियंता आर.एस. कुलकर्णी, उप अभियंता गांधिले आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, जालन्यातील उद्योगांना सातत्याने मदत करण्याची आपली भूमिका राहिली आहे. गत काही वर्षात विविध कारणांमुळे जालना उद्योगक्षेत्र अडचणीत आले होते. अशा वेळेत उद्योगाला कायमस्वरुपी वीज मिळावी, वीजबिलात सूट मिळावी यासाठी वैयक्तिकरीत्या मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न केले. जालना येथे मोठे उद्योग यावेत यासाठी उद्योग मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, येणाऱ्या काळात जालना औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन उद्योग येतील. औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ४१ कोटी रुपयांची रस्त्यांची कामे झाली आहेत.अतिरिक्त औद्योगिक वसाहत टप्पा तीनमध्ये अधिकाधिक उद्योग उभारण्यासाठी स्थानिक उद्योजकांनी पुढे येण्याची गरज असून, लघु उद्योजकांनीही भूखंडासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन खोतकर यांनी केले. कार्यकारी अभियंता आर. एस. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.