वडीगोद्री (जालना) : कोर्टात जीआर रद्द होईल म्हणून सरकारला एक महिना वेळ दिला. एक महिना वाढता पाठिंबा द्या. तुम्ही थंड पडू नका. आपली कसोटी आहे. गावोगावी साखळी उपोषण करा, शांततेत आंदोलन करा. आपल्याला एवढे शत्रू वाढले की, मराठ्यांनी आता सावध राहण्याची गरज आहे, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी केले.
उपोषणाच्या १६व्या दिवशी जरांगे यांनी समाज बांधवांशी संवाद साधला. आता जर झोपलात तर पुढची सर्व पिढी वाया जाईल. आपला लढा अंतिम टप्प्यात आहे. महिना दिला आहे. आता मी महिनाभर इथेच आहे. गाफील राहू नका. संभ्रम निर्माण करू नका. सरकार युद्धनीती वापरत आहे. त्यांनी तीन डाव टाकले आहेत. माणसे अंगावर घालायची सिस्टीम अगोदर सुरू केली. सरकारची कसोटी लागली तशी आपलीही कसोटी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष, संघटनांनी मराठ्यांना पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर कोणीही आले तरी त्यांना उद्धट बोलू नका, काळजी घ्या, असे आवाहन करीत जरांगे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
महिलांची पदयात्रा खडका येथील महिलांनी घराला कुलूप लावून अंतरवाली सराटी गावापर्यंत पदयात्रा काढली. मनोज जरांगे यांची कर्मभूमी असलेल्या गणेशनगर, मोहितेवस्ती, अंकुशनगर येथूनही सर्व मराठा बांधव व भगिनींची पदयात्रा लेझीम खेळत अंतरवाली सराटीत दाखल झाली. गढी ते गेवराई येथूनही मोठी पदयात्रा अंतरवाली सराटी गावात आली. उपोषणाच्या सोळाव्या दिवशीही मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी लोक येत होते.