अंबड: धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अमलबजावणी करण्यात यावी यासाठी दि.5 नोव्हेंबर पासून अंबड तालुक्यातील जामखेड येथे बेमुदत साखळी उपोषण सुरु केले होते. मात्र सरकारने आरक्षणाबाबत कोणताही सकारात्मक निर्णय न घेतल्याने 17 नोव्हेंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, आंदोलकांनी आज शासनाने दिलेला प्रस्ताव फेटाळला असून आमरण उपोषण सुरूच ठेवण्यावर ठाम आहेत.
भगवान (आबा )भोजने, भगवान आसाराम भोजने, देवलाल शिवाजी मंडलिक हे आंदोलक धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अमलबजावणीच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले आहेत. दरम्यान, आज आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार, उपविभाग अधिकारी श्रीमंत हरकर,उपविभागीय अधिकारी दीपक पाटील,तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. उपोषण स्थगित करण्यासाठी प्रस्ताव ठेवला परंतु, उपोषणकर्ते सरकारतर्फे पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पुढील निर्णय घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
सरकारने तातडीने निर्णय घ्यावा सरकारने धनगर जमातीची वारंवार फसवणूक करु नये. नसता सरकारला धनगरांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा उपोषणकर्ते भगवान भोजने यांनी दिला.आमरण उपोषण स्थळी दररोज विविध नेते, पदाधिकारी,संघटना भेट देवून पाठिंबा देत आहे.सरकारने तातडीने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
सरकार सकारात्मक आमदार नारायण कुचे यांनी, सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच आंदोलक शिष्टमंडळाची बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मागण्यांबाबत प्रशासन पाठपुरावा करत असून उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित करावे, अशी विनंती यावेळी केली.