जालना : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे इंग्लंड- साऊथ आफ्रिका टी-टष्ट्वेंटी मॅचवर सट्टा लावून जुगार खेळणाऱ्याविरूध्द एडीएस पथकाने (दरोडा प्रतिबंधक पथक) कारवाई केली. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली असून, कारवाईत ५७ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांविरूध्द घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील बसस्थानकाजवळ असलेल्या मेडिकल दुकानात इंग्लंड- साऊथ आफ्रिका टी- ट्वेन्टी मॅचवर सट्टा सुरू असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख पोनि यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून दरोडा प्रतिबंधक पथकाने रविवारी रात्री रांजणी येथील आनम मेडिकल दुकानावर कारवाई केली. मेडिकलमध्ये असलेल्या अख्तर अली सय्यद अली (रा. गढी मोहल्ला, रांजणी) याच्या मोबाईलची तपासणी केली असता मून एक्सचेंज ९९ लिंक सुरू होती. यात इंग्लंड- साऊथ आफ्रिका टी- ट्वेन्टी मॅच सुरू असल्याचे दिसून आले.
याबाबत चौकशी केल्यानंतर सय्यद याने सांगितले की, ती लिंक जालना येथील चिंतामणी ट्रॅव्हल्सचे रोहित यांनी पाठविली आहे. त्यांच्या सांगण्यावरून मला सट्ट्यात जिंकलेले पैसे रोहित देतो. तसेच दीपक (रा. सेलू जि.परभणी) यांनी रोहितची ओळख करून दिली आहे. या दोघांच्या सांगण्यावरून आपण मॅचमध्ये हारजीतवर सट्टा घेत असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी यावेळी मोबाईल, रोख ४७ हजार ८०० रूपये असा एकूण ५७ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वरील तिघांविरूध्द घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि यशवंत जाधव, पोहेकॉ रामप्रसाद रंगे, सुभाष पवार, राजू पवार, विजय निकाळजे यांच्या पथकाने केली.