जालना : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोमात सुरू आहे. या मोहिमेत युवकांपेक्षा ज्येष्ठ नागरिक लस घेण्यासाठी पुढे सरसावल्याचे दिसत आहे. गुरूवारपर्यंत जिल्ह्यातील ३३ हजार ९६४ ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली होती.
दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून ब्रेक द चेन सह इतर विविध उपक्रम राबविले जात आहेत. नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतराचा नियम पाळावा, सॅनिटायझर वापर करावे यासह इतर प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे. नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. कोरोना लढ्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेगही जिल्ह्यात वाढला आहे. आजवर जिल्ह्यातील ७८ हजार २८४ नागरिकांनी पहिला डोस तर ११ हजार ५०७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. विशेषत: या लसीकरण मोहिमेत ज्येष्ठ नागरिक पुढे असून, जिल्ह्यातील ३३ हजार ९६४ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.
जालना तालुक्यात सर्वाधिक लसीकरण
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत प्रारंभी जालना शहरासह ग्रामीण भागात लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्यामुळे येथील शासकीय, खासगी रूग्णालयातील केंद्रावर जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण झाले.
जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागातील लसीकरण मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. शिवाय या प्रयत्नांना सामाजिक संस्थांचीही साथ मिळू लागली आहे.
जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर सुरळीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. ग्रामीण भागातील केंद्रांवर ठराविक दिवशी लसीकरण केले जात आहे. केंद्रावर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. मुबलक प्रमाणात कोरोनाची लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-डॉ. संतोष कडले
ग्रामीण भागामध्ये ही उत्साह
शहरी भागातील लसीकरण केंद्रांवर अधिक प्रमाणात लसीकरण सुरू आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरील आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह इतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील केंद्रांवरही नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. लस घेतल्यानंतर दिली जाणारी औषधे घेतली जात असून, काही टक्के प्रमाण वगळता इतर नागरिकांना लसीकरणानंतर त्रास झाला नसल्याचे सांगण्यात आले.
लसीकरण केंद्र
८७
हेल्थकेअर वर्कर
१९५१२
फ्रंटलाईन वर्कर
१७९२०
ज्येष्ठ नागरिक
३३९६४
४५ वयापेक्षा जास्त
१८३९५
पहिला डोस
घेततलेले एकूण
७८२८४
दुसरा डोस
घेततलेले एकूण
११५०७