जालना : सध्या बाजारपेठेत पेरूला योग्य दर मिळत नसल्याने उत्पादक हवालदिल झाले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी पेरू फळावरील प्रक्रिया उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने पेरू उत्पादक शेतकरी, बचत गटातील महिला व शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांनी व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र (खरपुडी) यांच्यावतीने ‘पेरू फळांचे काढणीपश्चात तंत्रज्ञान व मूल्यवर्धन’ या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सोनुने बोलत होते. शेतीला जोड व्यवसाय सुरू केला तर शेतकरी कधीच अडचणीत येऊ शकणार नाहीत. पेरूच्या विविध पदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी असून, ठराविक देशातील कंपन्या हे काम करतात. हेच व्यवसाय स्थानिक पातळीवर सुरू व्हावेत व यातून स्थानिक युवकांना रोजगार मिळून अर्थकारण वाढेल, असेही सोनुने म्हणाले.
‘पेरू फळावर प्रक्रिया करण्यासाठी वाव व संधी’ या विषयावर शास्त्रज्ञ शशिकांत पाटील यांनी माहिती दिली. पेरूपासून पल्प, सिरप, जेली असे अनेक प्रकारचे पदार्थ कसे तयार करावेत, यासह इतर विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.