जालना : समाजातील वंचित घटक म्हणून ओळखले जाणाऱ्या तृतीयपंथीयांची दुनिया वेगळी आहे, आमचे प्रश्न, समस्या सोडविण्यास कोणालाही स्वारस्य नाही. आमचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हालाही खासदार, आमदार, मंत्री व्हावेसे वाटते, अशी भावना जालना शहरातील तृतीयपंथीयांनी व्यक्त केली आहे.माया शेख, तनुजा शेख, सोनी शेख, सलमाखान या चार तृतीयपंथीय मंडळींनी लोकमतशी बोलतांना त्यांच्या व्यथा मांडल्या. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील चांगेफळ येथील रहिवाशी माया शेखचे आठवी पर्यंत शिक्षण झाले आहे. तनुजा शेख मूळ पुसद येथील रहिवाशी असून, तिचेही शिक्षण आठवी पर्यंत झालेले आहे. सोनी व सलमा हे दोघे मात्र निरक्षर आहे. हे सर्व जालना शहरातील वाल्मिकीनगर येथे किरायाने राहतात. रेल्वे, बसस्थानक, बाजारात भिक्षा मागून ही मंडळी रोज पाचशे ते सहाशे रूपये कमवितात. वाढदिवस व लग्नाची हळद असेल तर तेथे नाचगाणे करून थोडेफार पैसे कमवितात.तृतीयपंथीयाच्या प्रश्ना संदर्भात माया शेख, तनुजा शेख सांगतात की, आम्ही खरे तृतीयपंथी आहोत. घराबाहेर पडल्यानंतर कुटुंबात जाणे आम्हास अपमानास्पद वाटते. नंतर आम्हाला गुरूदिक्षा घ्यावी लागते. यानंतर अंगावर दागिने, साडी घालावी लागते. भिक्षा मागतांना समाज दुषणे देतो, काही टपोरी मुले छेड काढतात, त्रास देतात, नीट बोलत नाही, भिक्षा देत नाहीत, शिव्या देतात. काही मंडळी तृतीयपंथी असल्याचे भासवून समाजाला लुबाडतात. त्यामुळे आमचा पंथ बदनाम होत आहे. कोल्हापूर, नाशिक, मुंबई, पुणे सारख्या शहरात तृतीयपंथी मंडळींना जेवढा मान-सन्मान मिळतो. तेवढा इतरत्र कुठेही मिळत नाही. एखाद्या गावात जर राहायचे ठरवले तर कुणी राहायला घर देत नाही. नळावर पाणी भरायला गेलो की, महिला व पुरूष मंडळी नाक मुरडतात, दूषणे देतात.तृतीयपंथीयाचे जगणे हे शापित आयुष्य जगण्या सारखे आहे. समाज वाईट नजरेने बघतो, शिक्षण नसल्याने कुठे नोकरी मिळत नाही, कर्ज किंवा शासकीय लाभाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. कधी कधी भिक्षा मिळत नाही. तेव्हा उपाशी राहावे लागते. चांगले जीवन जगावे, समाजात मान सन्मान मिळावा, अशी स्वप्ने आम्ही बघतो. मात्र, शेवटी वास्तवतेची जाणीव झाल्यानंतर स्वप्न शेवटी स्वप्नच राहतात. सामाजिक छळ, मानसिक त्रास यातून कधी कधी जीवन संपून टाकण्याचा विचार मनात येतो. मात्र सोबतची मंडळी जगण्याची हिंमत देतात व नवी उमेद जागवितात.आज भारतात तृतीयपंथी मंडळीतील अनेकजण न्यायाधीश, वकील, अधिकारी बनलेत. काही सामाजिक संस्थामध्ये कार्यरत आहेत. समाजातील सर्वात वंचित घटक म्हणून समजल्या जाणाऱ्या तृतीय पंथीयांच्या समस्या, तक्रारीकडे सर्वच दुर्लक्ष करीत आले असून, समाजाने तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज जालना शहरातील तृतीयपंथीयांनी विषद केली आहे. समाजाने तृतीयपंथीयांच्या दु:ख व वेदना जाणल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.समाजातील सर्वात वंचित घटक म्हणून जीवन जगत असलेल्या तृतीयपंथीयांकडे बघण्याचा सामाजिक दृष्टीकोन बदलण्याची गरज असून, समाजाने आम्हाला आधार द्यावा अशी अपेक्षाही या तृतीयपंथी मंडळींनी व्यक्त केली आहे.- शब्दांकन : राजेंद्र घुले, जालना.
समाजासह राजकारणातही तृतीयपंथी वंचित...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:33 AM