- श्याम पाटीलसुखापुरी (जि.जालना): अंबड तालुक्यातील वडीकाळ्या गावातील शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. संजय भाऊराव ढेबे (वय ४५) व संगीता संजय ढेबे (वय ४०) असे मयत दाम्पत्याची नावे आहे.
संजय ढेबे यांच्याकडे एका खासगी फायनान्स कंपनीचे कर्ज होते. घराचे बांधकाम, ट्रॅक्टर आणि मोटारसायकल घेण्यासाठी त्यांनी हे कर्ज काढले होते. सदरील कर्ज फेडण्यासाठी संजय ढेबे यांनी काही दिवसांपूर्वीच स्वतःची दोन एकर जमीन विकली होती. मात्र, जमीन विकूनही कर्ज फिटत नव्हते. उर्वरित कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीचे अधिकारी वारंवार चकरा मारून पैशासाठी तगादा लावला होते. शेवटी कर्जाच्या जाचाला कंटाळून संजय ढेबे व त्यांच्या पत्नी संगीता ढेबे यांनी राहत्या घरात साडीपासून बनलेल्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
शनिवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ही उघडकीस आली. गोंदी पोलीसांना या घटनेची माहिती पोलीस पाटलांनी दिल्यानंतर पोलीस कर्मचारी गायकवाड आणि पठाडे यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह पंचनाम्यासाठी ताब्यात घेतले. सुखापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शेतकरी दाम्पत्याच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास बिट अंमलदार गायकवाड हे करत आहेत.