भोकरदन : तालुक्यातील तळणी येथे अडीच महिने होऊन झाडांना मिरच्या लागत नसल्याने १५ शेतकऱ्यांनी नर्सरीसह कंपनीविरोधात पंचायत समितीच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच नर्सरीसह कंपनीविरोधात कडक कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
भोकरदन तालुक्यातील तळणी येथील पंधरा शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा (ता. फुलंब्री) येथील नवजीवन सिडींग नर्सरीतून प्रिया या वाणाची शिमला मिरचीची रोपे आणली होती. या रोपांची १३ मे २०२३ रोजी लागवड केली होती. त्यावर हजारो रुपये खर्च केले. लागवड केल्यानंतर ४५ दिवसांनंतर फुले लागतात. मात्र अडीच महिने होऊनही फुले, मिरची लागत नसल्याने शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क केला. शेतात येऊन पाहणी करण्याची मागणी त्यांनी केली. तरी कंपनीकडून आम्हाला अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मिरची लागवड केल्यापासून आतापर्यंत खते, मल्चिंग पेपर, मशागतीसह एकरी १ लाख ५० हजार रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे नर्सरीकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील दिला आहे. या निवेदनावर अरुण वाघ, अनिल गायके, संदीप गायके, विठ्ठल गायके, देवीदास वाघ, सुनील गायके, गणपत गायके, राजू गायके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शेतकऱ्यांनी उपटून फेकले झाडेअडीच महिने होऊनही मिरची लागत नसल्याने काही शेतकऱ्यांनी झाडे उपटून फेकली आहेत. शेतकऱ्यांनी उसनवारी आणि सौभाग्यवतीचे दागिने गहाण ठेवून मे महिन्यात शिमला मिरचीची लागवड केली होती. यंदा पाऊस उशिरा आल्याने शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणी विकत घेऊन शिमला मिरची जगवली. यातून भरघोस उत्पन्न मिळून कर्जमुक्त व्हावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, झाडांना मिरच्याच लागल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे.