देशासह राज्यात मागील वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. मागील काही दिवसांपासून तर रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या काळात बहुतांश जण घरी राहूनच काम करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल, असे वाटले होते. परंतु, तसे झाले नाही. २०१९ साली जिल्ह्यात ९७९ चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी २९९ उघडकीस आल्या आहेत. २०२० साली यात वाढ झाली. यावर्षी तब्बल १ हजार २१५ चोरीच्या घटना घडल्या. तर २०२१ साली म्हणेजच, मागील चार महिन्यांत ३४९ चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी ९७ उघडकीस आल्या आहेत. मागील दोन्ही वर्षांच्या चोऱ्यांचा विचार केल्यास मागील चार महिन्यांत काही प्रमाणात तरी गुन्हेगारी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बलात्कारही वाढले
जिल्ह्यात इतर गुन्हे कमी झाले असले तरी बलात्कारच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. २०१९ साली जिल्ह्यात तब्बल ३९ बलात्कारच्या घटना घडल्या होत्या. २०२०मध्ये यात २० ने वाढ झाली आहे. या साली तब्बल ५९ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. तर मागील चार महिन्यांत १६ बलात्कारच्या घटना घडल्या आहेत.
खुनाच्या घटना वाढल्या
कोरोनाकाळात खुनाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. २०१९ साली ३८ जणांचा खून झाला. २०२० मध्ये यात एकने घट झाली. २०२१ मध्ये चार महिन्यांतच १६ जणांचा खून झाला. त्यापैकी पोलिसांनी १५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तर एक गुन्हा उघडकीस आला नाही. चार महिन्यांतच १६ खून झाल्याने खळबळ उडाली आहे.
सध्या कोरोनात गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असले तरी ग्रामीण भागात दरोडा, घरफोड्या यासारख्या घटना घडत आहेत. दरोडेखोरांना पोलीस लवकरच जेरबंद करतील. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी व नियमांचे पालन करून सुरक्षित रहावे.
विनायक देशमुख, पोलीस अधीक्षक, जालना
२०१९ मध्ये झालेल्या चोरीच्या घटना- ९७९
२०२० मध्ये झालेल्या चोरीच्या घटना- १२१५
एप्रिल २०२१ पर्यंत झालेल्या चोरीच्या घटना- ३४९