जि.प.चा शिक्षक झाला पीएसआय : मुख्याध्यापक, शिक्षकांकडून सत्कार
कुंभार पिंपळगाव : शिक्षण क्षेत्रात काम करत असताना मी माझ्यातला शिक्षक कायम जागरूक ठेवून विद्यार्थी घडवण्याचे काम केले. आता मी शिक्षण क्षेत्र सोडले असले तरी जिथे कुठे माझी पोस्टिंग होईल, तेथील शाळेला भेट देऊन मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य करून माझ्यातला शिक्षक कायम ठेवेन, असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेले ज्ञानेश्वर एडवळे यांनी केले. राजाटाकळी येथे गुरुवारी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी केंद्रप्रमुख बा. ना. सोळंके, ग्रामपंचायत सदस्य किरण मोरे, केंद्रीय मुख्याध्यापक प्रमोद येडले, मुख्याध्यापक श्रीकृष्ण तौर, नितीन तौर, यशवंत मुळे आदींची उपस्थिती होती.
घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांनी ज्ञानदानाचे काम करत असतानाच राज्यसेवेची परीक्षा दिली. त्यापैकी एक शिक्षक आदिनाथ ढाकणे यांची गतवर्षी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली असून, ते अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत, तर नुकतीच ज्ञानेश्वर एडवळे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली असून, ते २४ जून रोजी नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी जात आहेत. त्यांचा गुरुवारी शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब धांडे, अशोक काकडे, अमर तौर, गोवर्धन खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बुद्रुकवाड यांनी केले, तर आप्पासाहेब तौर यांनी आभार मानले.