जालना : कोरोनासंसर्ग झपाट्याने वाढल्याने त्याला रोखण्यासाठी संचारबंदी, लॉकडाऊन आदी उपाययोजना केल्या जात आहेत. याला चांगला प्रतिसादसुद्धा मिळत आहे. मात्र, नवविवाहित मुलींना आपले माहेर दुरावल्याची खंत आहे. नवीन लग्न झालेल्या नववधूंना आषाढ महिन्यात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे माझ्या माहेरच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा, अशी त्यांची अवस्था झाली आहे.
लाॅकडाऊन कालावधीतही लग्नसोहळे पार पडत आहेत. एकदा लग्न लावून गेलेली मुलगी परतीला न येता सासरीच राहत आहे. लग्न झाल्यावर मुली किमान दोन ते तीन वेळा माहेरी येतात.
उन्हाळी सुटीत मुलांना शाळा नसते. अशात चार दिवस माहेरी जाऊन तेथील वातावरणात रमण्याची मनोमन इच्छा या मुलींना असते. मात्र, कोरोना महामारीने माहेरची वाट दूर गेली आहे.
सध्या विवाहित मुली आपल्या माहेरातील आई-वडील व इतर मंडळींशी मोबाइलवरून बोलत आहेत, तर कधी व्हिडिओ कॉल करून माहेरातील आठवणींना उजाळा देत आहेत.
नवीन लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला माहेरची ओढ लागते. पहिल्या सणाला नववधू माहेरी येतात. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आमची लेक माहेरी येऊ शकली नाही. मात्र, सण ती कशी साजरे करते हे व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही पाहिले आहे. नागपंचमीला येईल, अशी अपेक्षा आहे.
-रामकुवर पांचाळ
काही दिवसांपूर्वीच माझ्या लेकीचे लग्न झाले. लग्नानंतर ती केवळ एक ते दोन वेळा घरी आली. त्यानंतर पुन्हा परत आली नाही. कोरोना महामारीने माय- लेकींना दूर केले आहे. आता नागपंचमीला तरी ती येईल, अशी अपेक्षा आहे.
-अमृता पांढरे
गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाकाळात मला माहेरीसुद्धा जाता येत नाही. दीड वर्षात केवळ एकदाच मी माहेरी जाऊन आले आहे.
-अमृता राऊत, पाथरवाला
मी आणि माझी आई आम्ही मैत्रिणीसारख्या राहत होतो. त्यामुळे मला नेहमी माझ्या आईची आठवण येते. कोरोनामुळे माहेरी जाता न आल्याने मी आईला भेटण्यासाठी आतुर झाले आहे.
-कल्याणी पांचाळ, आंतरवाली