तळणी : पुर्णा नदीपात्रातून रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू चोरी सुरु आहे. या अवैध वाळू चोरी संदर्भात लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिका-यांनी अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी तहसीलदारांना फिरते पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी शुक्रवारी मंडळ अधिकारी, तलाठी व पोलिसांचे फिरते पथक स्थापन केले आहे.
मंठा तालुक्यातील उस्वद, कानडी, दुधा, सासखेडा, टाकळखोपा, वाघाळा, पोखरी, भूवन, वझर सरकटे येथून लॉकडाऊनच्या काळातही अवैध वाळू तस्करी जोरात सुरु आहे. दुधा व सासखेडा येथील वाळू तस्करांनी थेट नदी पात्रात टॅम्पो व ट्रॅक्टर उतरण्यासाठी रस्ते तयार केले. या ठिकाणाहून शेकडो ब्रास अवैध वाळूचे उत्खनन व चोरी सुरु आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी हायवामधून मंठा शहरात व तालुक्यातील बांधकामांना व सरकारी कामांना सर्रास वाळू पुरविली जात आहे. नदीपात्रापातून ट्रॅक्टरच्या साह्याने दुधा गावात साठा केल्यानंतर टॅम्पो, टिप्पर व हायवातून सर्रासपणे वाहतूक सुरु आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित केले होते.
या वृत्ताची जिल्हाधिकाºयांनी दखल घेतली असून, तहसीलदारांना फिरते पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार सुमन मोरे यांनी शुक्रवारी फिरत्या पथकाची स्थापना केली असून, यात मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल व पोलीस कर्मचारी असणार आहे. सदर पथक सोमवारपासून सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पुर्णा नदी परिसरात फिरणार असल्याने वाळू चोरीला आळा बसणार आहे.