लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दुष्काळाने गंभीरस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात अनेकांच्या हाताला रोजगार नसल्याने स्थलांतर वाढले आहे. हे स्थलांतर रोखण्यासह नागरिकांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने कामाचे नियोजन करून त्याचा आराखडा सादर करण्याचे निर्देश रोजगार हमी योजनेचे उपायुक्त पाटोदकर यांनी दिले.बुधवारी उपायुक्त पाटोदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंठा, परतूर येथील उपविभागिय अधिकारी तसेच तहसीलदारांची उपस्थिती होती. दरम्यान कृषी अधीक्षक शिंदे, आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांची हजेरी यावेळी होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ हेही उपस्थित होते.अनेकांना कामाची गरज : मजूर उपस्थितीतूनच चित्र स्पष्टजालना जिल्ह्यात जवळपास चारशे कामांवर १२ हजार ८०० मजूर आहेत. या मजुरांच्या उपस्थितीवरूनच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामांचे नियोजन करणे किती गरजेचे आहे, हे लक्षात घ्यावे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात किती आणि कोणकोणती कामे उपलब्ध करून देता येतील यावर भर द्यावा, तसेच त्यांचा स्वतंत्र आराखडा तयार करून तो जिल्हाधिका-यांकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश यावेळी पाटोदकर आणि रोजगार हमी योजनेचे प्रभारी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले. अनेक गावांतून कामे मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेण्याचेही यावेळी सूचित करण्यात आले.
प्रत्येक ग्रामपंचायतीने कामांचे नियोजन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:27 AM