लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आजचे पाल्य हे उद्याच्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना संस्कारी बनवून त्यांना शिक्षण देऊन , त्यांना खूप मोठे बनवा, असा उपदेश गोवत्स प.पू. राधाकृष्ण महाराज यांनी दिला.श्रीराम गोभक्त सेवा समिती, जालना यांच्यातर्फे स्व. रामेश्वर लोया सभा मंडप, पांजळापोळ परिसर येथे प.पू. राधाकृष्ण महाराज यांची रामकथा सुरु आहे. गुरुवारी तिसऱ्या दिवशी भाविकांना उपदेश देताना राधाकृष्ण महाराज म्हणाले की, आपण समाजात वावरताना घरातील संस्कार शोधण्याची गरज आहे. घर छोटे असेल तरी चालेल परंतू घरातील श्रेष्ठत्व शोधा; परंतु अलीकडच्या काळात मोठ्या घरात श्रेष्ठत्व संपत चालले की काय ? अशी भिती निर्माण झाली आहे.आजकाल प्रत्येक जण मान, सन्मान मिळावा यासाठी मोठी प्रतिष्ठा करत असतो; परंतु अशा मान, सन्मानाला दूर ठेवा. मान, सन्मानाचा भ्रम प्रत्येकाने आपल्या डोक्यातूनकाढून टाकावा. आपल्या कर्तृत्वातून आपल्याला आपोआपच प्रतिष्ठा समाज दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपले कर्तृत्व चांगले ठेवण्याची गरज आहे. प्रत्येक जीवन जगताना आनंदी राहावे. प्रत्येक जण हा २४ तास वाईट नसतो. त्यामुळे अशा लोकांची घृणा करु नका. उलट अशांना सुधारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपले कर्तृत्व हे आपल्या आचरणातून सिद्ध होत असते.त्यामुळे आपले आचरण चांगले ठेवा. यासाठी जीवनात तप करा. आजच्या घडीला संपत्ती तसेच इतर कारणांसाठी आपआपसात भांडणे सुरु आहेत. परंतू ही गोष्ट आपल्या अगोगतीकडे नेणारी आहेत. त्यामुळे आपआपसात कधीही भांडू नका. असे आवाहन करून गोमातेची सेवा करून तिचे पालनपोषन करण्याचे आवाहनही महाराजांनी यावेळी केले.