जालना : आजघडीला भारतात बेसुमार वृक्षतोडीमुळे तसेच वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. निसर्गाचा समतोल राखला जाऊन मानवी जीवन सुकर व्हावे, या दृष्टिकोनातून वृक्षलागवडीची चळवळ उभी होण्यासाठी राज्यात १० लाख वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. वृक्षांपासून नैसर्गिकरीत्या प्राणवायूची अधिकाधिक निर्मिती होऊन समाजातील प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी केले.
अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांच्या हस्ते शुक्रवारी घनसावंगी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, संत रामदास महाविद्यालय, पंचायत समिती येथे वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार नरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी एम. जी. जाधव, शिक्षणाधिकारी मंगल तुपे, गटशिक्षण अधिकारी रवी जोशी, मुख्याधिकारी नगर पंचायत विक्रम मांडुळगे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पतंगे, सुधाकर कापरे, आर. बी. वाहुळे, शिवाजी उगले, पंजाबराव देशमुख, ॲड. राजेंद्र देशमुख, नंदकुमार देशमुख, शेख न्याजू, रजाक बागवान, नरेंद्र जोगड, प्राचार्य राजेंद्र परदेशी, उपप्राचार्य सुभाष जाधव, भगवान मिरकड आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना अभ्यंकर म्हणाले, मानवी जीवनामध्ये वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वृक्षांची बेसुमार तोड करण्यात येऊन त्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात येत नसल्यामुळे अनेक संकटे आपल्यासमोर येत आहेत. कोरोना या आजारामध्ये सुद्धा प्राणवायूंच्या कमतरतेमुळे आपल्याला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. याच प्राणवायूंच्या कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे वाढते प्रदूषण कमी होऊन नैसर्गिकरीत्या प्राणवायूची निर्मिती होण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज बनली असल्याचेही त्यांनी सांगितले. अंबड तालुक्यातील जिजामाता हायस्कूल किनगाव येथेही अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तहसीलदार अंबड कडवकर, गटशिक्षण अधिकारी विपुल भागवत, लक्ष्मीकांत आटोळे आदींची उपस्थिती होती.