लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रथम ध्येय ठरवणे महत्वाचे आहे. एकदा का ध्येय ठरले की, नंतर त्या दिशेने जाण्यासाठी प्रयत्न आणि त्या प्रयत्नातील सातत्य महत्वाचे असते. ध्येय गाठतांना अनेक संकटे ही येतच असतात. परंतु संकटांना न घाबरता त्यांच्याशी सामना करूनच तुमची इच्छापूर्ती होऊ शकते असे मार्गदर्शन प.पू. गोविंद गिरी महाराज यांनी केले.रोटरी क्लब रेनबोतर्फे गोविंद गिरी महाराजांच्या तीन दिवसीय व्याख्यानाचे आयोजन येथील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात करण्यात आले आहे. यावेळी रेनबोचे अध्यक्ष विवेक मणियार, विष्णू चेचाणी, स्मिता चेचाणी आणि संजय राठी यांनी महाराजांचा सत्कार केला. या व्याख्यानाचा विषय हा जीवनात सफलता कशी मिळेल या संदर्भातील सफलता के मूलमंत्र हा होता.यावेळी गोविंद गिरी महाराजांनी सांगितले की, आज इंग्रजीतून अनेक पसुस्तके ही मॅनेजमेंट संदर्भात भारतात वाचली जात आहेत. परंतु ही इंग्रजी पुस्तके आता कुठे व्यवस्थापनावर सांगत आहेत, आपल्या प्राचीन ऋषी-मुनिंनी हे हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवले आहे. ज्याकडे आपण फारसे गंभीरतेने पाहत नाहीत. याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, समर्थ रामदास स्वामी यांनी स्वयंशिस्त कशी पाळावी हे दासबोध तसेच अन्य ग्रंथांतून नमूद केले आहे. आर्य चाणक्य, महाभारत तसेच त्यातही विदूर नीती असे एक ना अनेक ग्रंथांमधून मानवी जीवन सफल कसे होईल या संदर्भात विस्तृत लिखाण उपलब्ध आहे, परंतु ते आपण वाचत नाहीत, हे दुर्देवच म्हणावे लागेल.जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ ध्येय ठरवून चालणार नाही, तर ते गाठण्यासाठी प्रयत्नांमध्ये सातत्य हवे, सातत्य नसेल तर, ध्येय ठरवूनही त्याचा उपयोग नाही. भारतीय संस्कृतीत संस्काराला मोठे महत्त्व दिले आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्ती सोबतच चांगल्या आणि सकारात्मक विचार करणाऱ्यांशी मैत्री असेण हेही महत्वाचे आहे. चांगले आरोग्य हे देखील एका यशस्वी माणसाचे लक्षण ओळखले जाते. तुम्ही ठरवलेले लक्ष्य हे तुम्हाला महाभारतातील अर्जुनाप्रमाणे दिसले पाहिजे, असेही ते म्हणाले. एकूच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड अभ्यास करून आपल्याला राज्य घटना दिली आहे. तर माँ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजां सारख्या पराक्रमी पुत्राला जन्म दिल्याने त्यांचे मातृत्व धन्य झाले होते. आजच्या तांत्रिक युगात युवकांनी अपडेट राहणे गरजेचे झाले आहे. दररोज तंत्रज्ञानातील बदल स्वीकारावेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आपले लक्ष्य म्हणजे स्वराज्य निर्मितीची शपथ ही वयाच्या १४ वर्षीच घेऊन आपले ध्येय निश्चित केले होते. त्यामुळे त्यांचा आदर्श हा आपल्या डोळ्यासमोर युवकांनी कायम ठेवावा. माजी दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी देखील स्वप्न पाहून न थांबता ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला रात्री झोप आली नाही पाहिजे हे सांगून ठेवले आहे. त्यासाठी तुमचे मनन, चिंतन देखील महत्त्वाचे मुद्दे यशस्वी होण्यासाठी गरजेचे आहेत.
जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने ध्येय निश्चित करावे -प.पू. गोविंद गिरी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:27 AM