परतूर : तालुक्यातील यदलापूर येथील माजी सरपंच गोपाल मरळ यांचा ५ जानेवारी रोजी अपघाताचा बनाव करून चुलत भावानेच खून केल्याची धक्कादायक बाब बुधवारी उघडकीस आली. घटनेच्या ४० दिवसांनंतर पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला असून, चारचाकी वाहनासह आरोपीला अटक करण्यात आली आहे. बळीराम आनंदराव मरळ (रा. यदलापूर, ह. मु. औरंगाबाद) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
यदलापूर येथील माजी सरपंच गोपाळ मरळ यांच्या दुचाकीला ५ जानेवारी रोजी दहिफळ पाटीवर अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता; मात्र, हा खून असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. नंतर परतूर पोलिसांनी वेगवेगळ्या बाजूंनी तपास केला. जवळपास ४० दिवस पोलिस या गुन्ह्याचा तपास करीत होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांनी मयताचा चुलत भाऊ संशयित बळीराम मरळ (रा. यदलापूर, ह. मु. औरंगाबाद) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने जुन्या शेतीच्या वादातून हा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह त्याला ताब्यात घेतले आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन कोंडके, आबासाहेब बनसोडे, वाघ बोंडारे यांनी केली आहे.
मोबाइल लोकेशनवरून लागला छडा
यदलापूरचे माजी सरपंच गोपाळ मरळ हे दुचाकीने ५ जानेवारी रोजी जात होते. त्याचवेळी त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र, नातेवाइकांनी संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला. पोलिसांनी नातेवाइकांशी बोलून गोपाळ मरळ यांचा कोणाशी वाद होता का? अशी विचारणा केली. त्यावेळी पोलिसांना संशयित बळीराम मरळ याचे नाव कळाले. नंतर पोलिसांनी माहिती काढली. शिवाय, घटनेच्या दिवशी बळीराम मरळ याच्या मोबाइलचे लोकेशन घटनास्थळी दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास केला.