लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर व ग्रामीण भागात मोठ्या संख्येने इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू आहेत. या शाळा नियमांचे उल्लंघन करीत असल्यामुळे जिल्ह्यातील २५० शाळांची शिक्षण विभागाच्या विशेष पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.गेल्या काही वर्षापासून मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याकडे शैक्षणिक संस्थांचा कल वाढू लागला आहे. राजकीय पुढारी, सामाजिक संस्था, उद्योजक व व्यापारी यांनीही नवीन शाळा सुरू करण्याचा धडाका लावला आहे. बऱ्याच शाळा या खाजगी निवासी इमारती व बंगल्यांमध्येच सुरू करण्यात आलेल्या आहेत. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रवेशही घेतल्याचे आढळून येते.दरम्यान, शिक्षण विभागाने दिलेल्या नियमांचे पालन इंग्रजी माध्यमांच्या शाळा करत नसल्याचे जि.प. सदस्यांनी काही दिवसांपूर्वीच जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांच्या लक्षात आणून दिले. याबाबत प्रशासनाने कडक पावले उचलली असून, जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी दिली.बहुसंख्य इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये फारशा सुविधा उपलब्ध नसताना विद्यार्थ्यांकडून सर्रासपणे भरमसाठ शुल्क वसूल केले जात असल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. शासनाकडून शुल्काबाबतची नियमावली ठरवून देण्यात आलेली आहे. मात्र, काही शाळांकडून जाणूनबुजून याची अंमलबजावणी केली जात नसल्याच्या तक्रारी पालकांकडून केल्या जातात. दरम्यान, याबाबत दोन दिवसांपूर्वी शिक्षणाधिकारी दातखील यांनी गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने ही तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी वेगवेगळ््या पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. या पथकांमध्ये गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आदींचा समावेश असणार आहे.जि.प. सभेत गाजला मुद्दाजिल्हा परिषदेच्या सभेत इंग्रजी शाळांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या मुद्यावरुन सदस्यांनी प्रशासनास चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी इग्रंजी माध्यमांच्या शाळांची तपासणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले होते. आता पथके तयार करुन तपासणी करण्यात येणार आहे.
इंग्रजी शाळांची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:22 AM