लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : कोळशासाठी दुधना काठावरील झाडांची कत्तल करण्यात येत असल्याचे वृत्त लोकमतने दि. २० डिसेंबरच्या अंकात प्रकाशित केले होते. ‘परतूर तालुक्यात कोळशासाठी उभ्या झाडांची कत्तल’ या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या वृत्ताची अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून, गुरुवारी वन विभागाच्या अधिका-यांनी परिसराची पाहाणी केली.मागील काही दिवसांपासून तालुक्यातील दुधना नदीच्या काठावरील झाडांची कोळसा तयार करण्यासाठी कत्तल करण्यात येत आहे. येथील वृक्षतोडून लाकडे वाळल्यानंतर याच परिसरात लाकडाच्या भट्ट्या लावून कोळसा काढण्याचे काम दुधना काठच्या पुनर्वसीत झालेल्या परिसरात चालत होते. जेसीबीच्या व टोळीच्या माध्यमातून ही झाडे तोडली जात होती. या ठिकाणी तयार होणारा कोळसा शहरात ट्रकने पाठविण्यात येत होता. कमी धुर असणाºया व अधिक उष्णता देणा-या कोळशाला शहरात मोठी मागणी आहे. यासाठी येथे हा उद्योग चालत होता.या संदर्भात लोकमतने दि. २० डिसेंबर रोजी परतूर तालुक्यात कोळशासाठी उभ्या झाडांची कत्तल या मथळ््याखाली होत प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची वन विभागाच्या अधिका-यांनी दखल घेतली असून, शुक्रवारी दुपारी वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी आर. एस. राठोड यांच्या पथकाने परिसराची पाहाणी करत संबधिताविरुध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.दरम्यान, झाडांची कत्तल होत असल्याने पावसाचे प्रमाण कमी होत आहे. असे असतानाही काही लोक झाडांची आपल्या फायद्यासाठी तोड करत असून, अशा लोकांविरुध्द कडक करावाई करण्याची मागणी होत आहे.वन विभागाचे पथक या भागात दिसताच विनापरवानगी वृक्षतोड करणा-या टोळीच्या म्होरक्याने पळ काढला. वन विभागाच्या पथकाने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; परंतु ते हाती लागले नाही. मात्र या ठिकाणी तोडलेल्या झाडांची लाकडे, भट्ट्या, उजाड झालेला भाग अधिका-यांना दिसला.वृक्षतोड करणारी टोळी दिवसभर वृक्षतोड करून भट्ट्या लावून कोळसा काढतात. त्यानंतर रात्री जुन्या गावात गुप्त धनाचाही शोध घेत असल्याचे सांगण्यात येते. यासाठी जुन्या गावात मोठमोठे खड्डेही खोदण्यात आल्याचे आढळून आले आहेत.
‘त्या’ वृक्षतोडीची वन विभागाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 1:06 AM