जालना : मानवी शरीरातील चयापचयासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे; परंतु या पाण्याचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन केले, तर डोकेदुखी, उलटी यासह इतर शारीरिक त्रास जाणवू शकतात.
दैनंदिन जीवनात पुरेसे आणि प्रमाणात पाणी पिले, तर पचन प्रक्रिया चांगल्या पद्धतीने होते. शिवाय डोकेदुखी, वजनवाढ, अन्नपचनात प्रमाणित पाण्याचा लाभ होतो. शारीरिक हलचालीनुसार शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे आपले वय, वजनानुसार दैनंदिन आवश्यक पाणी पिणे गरजेचे आहे.
शरीराला पाणी कमी पडले तर...
शरीरात पाण्याचा समतोल राहणे गरजेचे आहे. शरीराला पाणी कमी पडले, तर डोकेदुखी, उलटी, मळमळ यासह इतर शारीरिक त्रास जाणवू शकतात. शिवाय मूत्रपिंडावरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनीच दैनंदिन प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.
शरीराला पाणी जास्त झाले तर...
शरीरात पाणी कमी झाल्यानंतर जसे दुष्परिणाम होतात, तसेच पाणी अधिक झाल्यानंतरही होतात. यात डोकेदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, मानसिक स्वास्थ्य बिघडण्यासह मूत्रपिंडावर अधिकचा भार येऊ शकतो. शिवाय इतरही काही शारीरिक त्रास होऊ शकतात.
तज्ज्ञ काय म्हणतात...
मानवी शरीरातील अन्नपचनासह इतर प्रक्रियांमध्ये पाणी हा महत्त्वाचा घटक आहे; परंतु प्रमाणात पाणी पिण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. कमी पाणी पिल्यामुळे जसा त्रास होतो त्याचप्रमाणे अधिक प्रमाणात पाणी पिल्यानंतरही शरीराला त्रास होतो.
-डॉ. व्ही.व्ही. पिंगळे
मानवी शरीराला नियमित आणि प्रमाणात पाणी मिळणे गरजेचे आहे. अनेक जण कमी प्रमाणात पाणी पितात. अन्नपचनात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे दैनंदिन आपल्या वय आणि वजनानुसार पाण्याचे सेवन करावे. पाणी पिताना शक्यतो उकळून प्यावे किंवा निर्जंतुकीकरण औषधे वापरून पिण्याचे पाणी प्यावे.
-डॉ. अर्चना भोसले
कोणी किती प्यावे पाणी?
वजनदिवसाला किती
पाणी (लिटर)
३६ किलो १.२
४५ किलो १.५
५४ किलो १.८
६४ किलो २.१
७३ किलो २.४
८२ किलो २.७