जालना : सतत गैरहजर राहणाऱ्या ११ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी गुरूवारी निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांवर कारवाया सुरू आहे. अवैध धंद्याबरोबरच डॉ. शिंदे यांनी आता जिल्हा पोलीस दलातील सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. वारंवार सांगूनही ते गैरहजर राहत असल्याने ११ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये पोलीस मुख्यालयातील ४, भोकरदन पोलीस ठाण्यातील ३, कदीम २, तालुका जालना १, जाफराबाद १ अशा एकूण ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.