जालना : येथील व्यापारी अलोकचंद लाहोटी यांच्या घरी गत चाळीस वर्षांपासून घरकाम करणाऱ्या भीमा धांडे (५५, रा. नूतन वसाहत) या संशयिताने मंगळवारी अलोकचंद यांची पत्नी संगीता लाहोटी (६२) यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी नऊ वाजेच्या सुमारास चाकूने वार करून त्यांची हत्या केली. हत्या केल्यावर भीमा धांडे यानेही विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भीमा धांडे याने संगीता लाहोटी या घरी एकट्याच असल्याची संधी साधली व स्वयंपाकघरातील चाकूने त्यांच्या छातीत, पोटात चाकूने सपासप वार केले. त्यामुळे संगीता लाहोटी या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. लाहोटी यांच्यावर हल्ला केल्यानंतर भीमा धांडे याने स्वत: विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पोलिसांनी तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सदरबाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर यांनी दिली.
नोकराकडून दगडफेकसंगीता लाहोटी या नेहमीच सामाजिक आणि योगसाधनेत हिरिरिने सहभाग घेत. त्या येथील जेपीसी बँकेच्या माजी संचालिकाही होत्या. भीमा धांडे परिवारातील अत्यंत विश्वासू नोकर होता. मात्र, गत काही महिन्यांत लाहोटी यांच्या परिवारातील अंतर्गत बाबी तो अन्य नागरिकांना जाऊन सांगायचा. लाहोटी यांनी त्याला हे न करण्याची सूचना केली. त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग धांडे याला आला. त्याने या रागातच मुख्य पोस्ट ऑफिस कार्यालयाजवळील लाहोटी यांच्या निवासस्थानावर दगडफेक केली. लोहोटी हे सदरबाजार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्याचे त्याला कळल्यावर त्याने हे कृत्य केले असावे, असे पोलिसांनी सांगितले.
घटनेने शहरात हळहळसंगीता लाहोटी यांचे सामाजिक कार्यातील योगदान मोठे होते. लाहोटी परिवार हा येथील प्रतिष्ठित परिवारांपैकी एक आहे. संगीता लाहोटी यांची हत्या झाल्याची चर्चा सकाळी शहरात वाऱ्यासारखी पसरली. ही माहिती मिळताच शहरातील अनेक व्यापारी, उद्योजकांनी अलोकचंद लाहोटी, सुनील लाहोटी यांची भेट घेऊन सांत्वन केले. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीदेखील सकाळी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना सूचना केल्या.