जालना : चार दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलेल्या चिमुकल्याचा विहिरीमध्ये मृतदेह आढळल्याची घटना जालना तालुक्यातील धारकल्याण येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. विनायक बळिराम ढोबळे (५ रा. धारकल्याण, ता. जि. जालना) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, त्याच्या घातपाताची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विनायक ढोबळे हा २२ ऑक्टोबर राेजी दुपारी चार वाजेच्या सुमारास धारकल्याण येथील विनायक महाराज मंदिराजवळ खेळत होता. त्याचवेळी अज्ञात लोकांनी त्याला कशाचे तरी आमिष दाखवून त्याचे अपहरण केले होते. या प्रकरणी संतोष रंगनाथ ढोबळे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सावळे हे करीत होते. त्यातच बुधवारी दुपारी धारकल्याण येथील एका विहिरीमध्ये चिमुकल्याचा मृतदेह आढळला. याची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली.
तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सपोनि. सावळे, पोलिस कर्मचारी चापळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, घातपाताची शक्यता वर्तविण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. दरम्यान, आम्ही तपास करत असून, खून झाला की नाही, ही बाब शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल, अशी माहिती पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली आहे.