लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा निवडणुकीसाठी एकूण २० उमेदवार निवडणूक लढवत असुन, सर्व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी निवडणूक निरीक्षक (खर्च) यांनी ११ एप्रिल रोजी केली होती.या तपासणीसाठी २० पैकी १६ उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून निवडणूक निरीक्षक (खर्च) पवन कुमार यांनी झालेल्या खचार्ची तपासणी केली. दैनंदिन खर्च तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटीसंदर्भात ४८ तासाच्या आत खुलासा सादर करण्याचे सांगण्यात आले होते. निवडणूक खर्च तपासणीप्रसंगी अनुपस्थित असलेल्या अनिता लालचंद खंदाडे, रतन आसाराम लांडगे, शहादेव महादेव पालवे, लीलाबाई धर्मा सपकाळ या उमेदवारांना ४८ तासाच्या आत खुलासा सादर करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती.तसेच १५ एप्रिल रोजी निवडणूक निरीक्षक पवनकुमार यांनी जालना लोकसभा मतदार संघामध्ये निवडणूक लढवणाऱ्या एकूण २० उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसऱ्यांदा तपासणी केली.यामध्ये पवनकुमार यांनी उमेदवारांच्या दैनंदिन खर्च नोंदवह्यांची तपासणी केली असता तपासणी दरम्यान ज्या उमेदवारांनी रोखीने व्यवहार केलेले आहेत, बँक खात्यात रोखीने पैसे जमा केलेले आहेत आणि एकाच बाबीवर १० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च रोखीने केला आहे.अशा १४ उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आल्या. याबाबत ४८ तासांच्या आत खुलासा सादर करण्याबाबत कळविण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजीव नंदकर यांनी दिली.
निरीक्षकांकडून खर्चाचा आढावा; १४ उमेदवारांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:36 AM