जालना : महागड्या दुचाकींना लक्ष्य करून हातोहात दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून पाच दुचाकींसह चार मोबाईल असा ८ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी जालना शहरातील नूतन वसाहत भागात करण्यात आली. विशेष म्हणजे पुणे व परिसरात चोरलेल्या दुचाकी, मोबाईल जालना व परिसरात विक्री केले जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी एकजण नूतन वसाहत भागात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला रविवारी मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पथकाने नूतन वसाहत भागात कारवाई करून संदेश प्रभाकर पाटोळे (रा. शिराळा ता. जाफराबाद ह.मु. जालना) यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवित चौकशी केल्यानंतर त्याने त्याचा साथीदार सुरज राजू कसबे (रा. रा. म्हाडा कॉलनी, जालना) याच्या समवेत पुणे येथील मोरे वस्ती भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेवून चौकशी केल्यानंतर त्यांनी पुणे व परिसरातून चोरलेल्या दुचाकी, मोबाईलची माहिती दिली. तसेच पोलिसांनी त्यांच्याकडून पाच दुचाकी व चार मोबाईल असा ८ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पाेलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग, पोउपनि. प्रमोद बोंडले, अंमलदार सॅम्युअल कांबळे, भाऊसाहेब गायके, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, रवी जाधव, धीरज भोसले, कैलास चेके, योगेश सहाने, सुरज साठे, रमेश पैठणे यांच्या पथकाने केली.
पुणे पोलीस जालन्यातपुणे व परिसरातून दुचाकींसह मोबाईल चोरणारे जेरबंद केल्याची माहिती जालना पोलिसांनी पुणे पोलिसांना दिली होती. ही माहिती मिळताच पुणे पोलिसांचे पथक सोमवारी जालना येथे दाखल झाले असून, कायदेशीर प्रक्रियेनंतर संबंधित संशयितांना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे पोनि. सुभाष भुजंग यांनी सांगितले.