लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येणाऱ्या उडीद, मूग, सोयाबीनच्या नोंदणीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असून, ज्या शेतकऱ्यांच्या हाती थोडेफार उत्पादन लागले असेल अशांच्या मालाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात पाच केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.यंदाच्या खरीप हंगामात पीक वाढीच्या काळात कमी- अधिक प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे पिके चांगली आली होती. पिकांची वाढ पाहता उत्पादीत होणारा माल खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात पाच ठिकाणी हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली होती. जालना- बदनापूर तालुक्यासाठी जालना येथे, अंबड येथे, भोकरदन- जाफराबादसाठी भोकरदन येथे, घनसावंगी येथे व मंठा, परतूरसाठी परतूर येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. यंदा मुगासाठी ७०५०, उडदासाठी ५७०० व सोयाबीनसाठी ३७१० रूपये हमीभाव शासनाने जाहीर केला होता. त्यानुसार या केंद्रांवर नाफेडमार्फत खरेदी केली जाणार होती. मात्र, परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसापूर्वी ज्या शेतक-यांनी माल काढून घेतला आहे, अशांचा माल खरेदी केला जाणार आहे. या हमीभाव केंद्रावर नोंदणी करण्यासाठी १५ आॅक्टोबर पर्यंत मुदत होती. नंतर ही मुदत ३१ आॅक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली. होणारी मागणी पाहता नंतर १५ नोव्हेंबर मुदत वाढवून दिली आहे.
खरेदी केंद्रावरील नोंदणीला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 12:38 AM