जालना/मुंबई - भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी स्वत: याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे, तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पंकजा मुंडे ह्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या असल्याचं म्हटलं. मात्र, गेवराई येथील कार्यक्रमात पंकजा मुंडेंच्या अगोदर भाषण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओ संदर्भातही बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, पंकजा मुंडेंच्या नाराजीबद्दल अफवा पसरवणारा एक गट भाजपातच आहे, असेही त्यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री फडणवीस गेल्या २० दिवसांत बीड जिल्ह्यात दोनवेळा येऊन गेले. त्यांच्या दोन्ही कार्यक्रमाला पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांची गैरहजेरी होती. या दोन्ही ताईंच्या गैरहजेरीची चर्चा झाली. गेल्या काही दिवसापासून पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. मात्र, बावनकुळे यांच्या गेवराई दौऱ्यावर या बातम्यांवर पडदा पडला आहे.
“भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तेच ही बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिलं. ती माझी जबाबदारी आहे, मी काही उपकार केलेले नाहीत. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे त्यांना तुम्ही नंतर बोला, मी आधी बोलतो असे म्हटले. हाच त्यामागील आशय होता, असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी व्हायरल व्हिडिओबद्दल दिलं आहे.
उर्फी अन् चित्रा वाघ प्रकरणावरही केलं भाष्य
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज जालना जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ यांना भाजपचे समर्थन नसल्याने त्या कमी पडल्या का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर, भाजपात समर्थक किंवा बेसमर्थक असं काही नाही. चित्रा वाघ यांनी त्यांची भूमिका मांडली आहे, ज्या विषयांवर त्यांनी भूमिका मांडली त्यांवर बोलायला त्या सक्षम असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं.
पक्षाच्या कार्यक्रमाला मी आले
माझ्या नाराजीबाबत प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले आहे. त्यांना मी ओव्हरटेक करीत नाही. प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले हीच मोठी गोष्ट आहे. त्या दोन्ही कार्यक्रमांत मी अपेक्षित नव्हते. त्यामुळे आले नाही. आज गेवराईतील पक्षाच्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष आले म्हणून मी आले. यापूर्वीही जे. पी. नड्डा आले होते तेव्हा मी आले होते, असेही पंकजा म्हणाल्या.