लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना तालुक्यासह अन्य तालुक्यांमध्ये गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू असल्याने शासनाच्या लाखो रूपयांच्या रॉयल्टी वसुलीवर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. ड्रायपोर्ट परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खनाबाबत परिसरातील ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे.जालना जिल्ह्यात अवैध वाळूसह स्टोन क्रशर चालविण्यासाठी खदानीतून मोठ्या प्रमाणावर दगडाची गरज पडते. हे दगडाचे उत्खनन करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या निकषांपेक्षा अधिकचे उत्खनन होत आहे.या संदर्भात येथील जिल्हा गौण खनिज विभाकडे संर्पक केला असता, तसे काही होत नसल्याचे वरवर सांगून जबाबदारी झटकण्याचे काम सुरू आहे.वर्षभरापूर्वी जालना तालुक्यातील खदानीतून मोठ्या प्रमाणावर दगडाचे क्षमतेपेक्षा जास्तीचे उत्खनन झाल्याचे औरंगाबाद येथील वरिष्ठ अधिका-यांनी अचानक तपासणी करून मोठी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतरही यात गौण खनिज विभागाने काहीजणांना थातूरमातूर दंड आकारून हे प्रकरण थंड बस्त्यात टाकले आहे. आज जालन्यात अनेक बडे स्टोन क्रशर चालक असून, त्यांना दगडाचे उत्खनन करून त्यापासून रस्ते तसेच घर बांधणीसाठी लागणारी खडीचे उत्पादन किती करावे यासाठीचे निकष घालून दिले आहेत. परंतु याचेही सर्रास उल्लंघन होत असल्याचे वास्तव आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
गौण खनिजाचे बेसुमार उत्खनन; प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 1:04 AM