वडीगोद्री (जि. जालना) : मूळ सोलापूर येथील एका ५० वर्षीय शिक्षकाने अंबड तालुक्यातील मठतांडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. केरप्पा दिगंबर घोडके (५० रा. सोलापूर, हल्ली मुक्काम पाचोड) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
मठतांडा येथे पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेत दोन शिक्षक आहेत. शिक्षक केरप्पा घोडके हे मंगळवारी शाळेत आले होते. दुपारपर्यंत त्यांनी मुलांना शिकविले. मुलांना जेवण्यासाठी सुट्टी दिली. नंतर ते शाळेतील वापरात नसलेल्या खोलीत गेले. तेथे लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब ग्रामस्थांना कळताच त्यांनी याची माहिती गोंदी पोलिसांना दिली. गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोहेकॉ मदन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह खाली उतरविला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबड येथे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्षक केरप्पा दिगंबर घोडके हे मूळ सोलापूर येथील असून, ते हल्ली पाचोड येथे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत, अशी माहिती गोंदी पोलिसांनी दिली.