पांगरी रस्त्याची दुरवस्था
मंठा : तालुक्यातील यदलापूर- पांगरी या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे. शिवाय सूचना फलक नसल्याने चालकांची गैरसोय होत आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
भांबेरी येथे ४१ दात्यांचे रक्तदान
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील भांबेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ४१ शिवभक्तांनी रक्तदान केले. येथील छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या युवकांनी हा उपक्रम राबविला. यावेळी सरपंच सहदेव भारती, सुरेश उत्तम केजभट, राजेंद्र शेंबडे, अप्पासाहेब नलावडे, जगदीश कणके, विकास कणके, बळीराम कणके, शिवाजी कणके, तुळशीराम केजभट, ज्ञानेश्वर ठोंबरे, भागवत कणके, दत्तात्रय केजभट यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
किशोर नरवडे यांची अध्यक्षपदी निवड
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील बळेगाव येथील किशोर बंडेराव नरवडे यांची अंबड तालुका संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. निराधारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण काम करणार असल्याचे नरवडे यांनी सांगितले. या निवडीचे तालुक्यात सर्वत्र स्वागत केले जात आहे.
उक्कडगावातील यात्रा कोरोनामुळे रद्द
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील उक्कडगाव येथे शिवरात्रीनिमित्त होणारा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, व्यापाऱ्यांनी आपली दुकाने लावू नयेत, कोरोनातील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.