जालना : कोरोनामुळे शासकीय रूग्णालयांत गेल्या वर्षभरापासून डोळ्यांच्या शस्त्रक्रिया कमी प्रमाणात केल्या जात आहेत. त्यामुळे ज्येष्ठांसमोर अंधार निर्माण झाला आहे. जिल्ह्यात तब्बल ३,८४० जणांच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत.
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोतिबिंदू नेत्र शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु, मागील वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याचा परिणाम मोतिबिंदू शस्त्रक्रियांवर होत आहे. कोरोनाच्या भीतीपोटी अनेकजण शस्त्रक्रियेसाठी येत नाहीत. जिल्ह्यात दर महिन्याला ३०० ते ३३० शस्त्रक्रिया हाेतात. परंतु, गतवर्षीपासून महिन्याला केवळ १८ ते २० जणांवरच शस्त्रक्रिया होत आहे. त्यानुसार जिल्ह्यात तब्बल ३,८४० जणांच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. जिल्ह्यात खासगी व शासकीय रूग्णालयात आतापर्यंत १,२०० शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती नेत्र विभागाचे नोडल अधिकारी डॉ. संजय साळवे यांनी दिली.
कोरोनाच्या भीतीमुळे अनेकजण शस्त्रक्रिया करण्यासाठी येत नाहीत. शिवाय आमच्या विभागातील बहुतांश जणांची ड्युटी कोविड रूग्णालयात लावण्यात आली आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया कमी होत आहेत.
- डाॅ. संजय साळवे, नोडल अधिकारी.
मला दिसत नाही. त्यामुळे डोळ्यांची शस्त्रक्रिया करायची होती. परंतु, मागील वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना काळात घराबाहेर पडत येत नाही. त्यामुळे माझ्या डोळ्यांची शस्त्रक्रिया रखडली आहे.
- राम ढोले, रूग्णाची प्रतिक्रिया
कोरोनामुळे वर्षभरापासून माझ्या डोळ्यांची शस्त्रक्रिया रखडली आहे. सतत लॉकडाऊन होत असल्याने शहराच्या ठिकाणी जाता येत नाही. शिवाय कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची भीती वाटते.
- अंजना माने, रूग्णाची प्रतिक्रिया
मला डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले आहे. परंतु, मागील वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातल्याने शस्त्रक्रिया करता येत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर मी शस्त्रक्रिया करणार आहे.
- अमोल सिंग. रूग्णाची प्रतिक्रिया