जालना : जालन्यात सलग दुस-या दिवशी अर्थात शनिवारी देखील कृषी विभागाच्या हाती सेंद्रिय खताच्या नावाखाली बनावट खतांचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा साठा जवळपास साडेचारशे मेट्रीक टन असल्याची माहिती कृषी विभागाने दिली असून, याची अंदाजित किंमत ही ९० लाख रूपये असल्याचे सांगण्यात आले.शुक्रवारी कृषी विभागाने जालन्यापासून जवळच असलेल्या गुंडेवाडी येथील राजलक्ष्मी फर्टी लायझरमध्ये नियमित तपासणीसाठी कृषी अधिक्षक बाळासाहेब इंगाले हे गेले असता, त्यांना त्याच कारखान्यात पत्राच्या शेडमध्ये निंबोळी पॉवर हे बनावट खत निर्मिती करताना आढळून आले होते. याची माहिती लगेचच शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. ते लगेचच पोलिसांच्या फौज्यट्यासह दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी ६३ लाख रूपयांचा साठा जप्त कला होता. त्यावेळी सेंद्रिय खत म्हणून सर्रासपणे वेगेगळ्या फळांचे टरफल वापरून ते शेतक-यांच्या माथी मारले होते.अशाच प्रकारे शुक्रवारी देखील गोपनिय माहिती मिळाल्यावर कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, विजय माईनकर, गणवत्ता नियंत्रक सायप्पा गरांडे यांनी औद्योगिक वसहातीतील वरद फर्टीलायझरला सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान भेट दिली असता, खतांच्या गोण्यामध्ये मातीमध्ये केवळ पाच टक्के लिंबोळीचा अर्क असल्याचे दिसून आले. तसेच लिंबोळीचा अर्क असलेला स्प्रे मातीवर फवारून हे सेंद्रिय खत म्हणून सर्रासपणे विक्री होत होते. एक ४० किलोची गोणी ही ७२० रूपयांना विक्री होत होती. असा जवळपास ४०० मेट्रीक टनापेक्षा अधिकचा साठा येथे आढळून आल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान गुंडेवाडी प्रमाणेच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी वरद फर्टीलायझरमध्ये भेट देऊन बनावट साठ्याची पाहणी केली. दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वरद फर्टीलायझरच्या संचालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी दिली.
जालन्यात ९० लाखाचा बनावट सेंद्रिय खताचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 12:33 AM