लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दहा दिवसांपूर्वी जालन्यातील कल्पेश टापर यांच्या निवासस्थानी पोलीस आणि कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून ६४ लाख रूपयांचे बोगस बिायणे जप्त केले होते. या प्रकरणात यापूर्वीच गुजरातमधून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून आणखी चौकशी केली असता त्याने गुजरातेतील अनेक बड्या बियाणे उत्पादकांची नावे सांगितल्याचे कळते.याचा अधिक तपास करण्यासाठी पोलीस आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेले एक पथक गुजरातकडे रवाना झाले आहे. हे पथक रविवारी गुजरातेत गेल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने जामीन दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.असे असले तरी त्यांना शहर सोडून न जाण्याच्या सूचना आहेत. दहा दिवसांपूर्वी यातील मुख्य आरोपी कल्पेश टापर याच्या जुन्या जालन्यातील निवासस्थानी अचानक छापा टाकून कपाशीच्या बियाणांचा साठा जप्त केला होता.या साठ्यातील बियाणांचे नुमने हे कृषी विभागाने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात आले.टापर याच्यासह या प्रकरणातील वाढेकर, निहाळ या आरोपींकडूनही बरीच माहिती उजेडात आल्याने या प्रकरणाची मोठी व्याप्ती वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. रविवारी अधिक तपासासाठी पथक रवाना झाल्याचे सांगण्यात आले आहे.
बनावट बियाणे; पथक गुजरातकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:58 AM