जालना : ट्रक घेण्यासाठी उचललेल्या फायनान्सचे हप्ते बंद करून इन्शुरन्सचे पैसे मिळण्यासाठी ट्रक चोरी गेल्याचा बनाव करणाऱ्या फिर्यादीसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी ताब्यात घेतले. समीर कलीम शेख (३८), इस्माईल रफिक सय्यद (३३, दोघे, रा. कोळीबोडखा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), शेख रोशन उर्फ जमीर शेख जहिरोद्दीन (३०, रा. संजयनगर, छत्रपती संभाजीनगर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
महिनाभरापूर्वी गोंदी ठाण्याच्या हद्दीतून ट्रक चोरी केल्याची तक्रार समीर कलीम शेख यांनी दिली होती. या गुन्ह्याचा तपास पोलिस करीत होते. तांत्रिक विश्लेषण केले असता, त्यात फिर्यादीच आरोपी असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी फिर्यादीला चौकशीसाठी बोलावले. प्रश्नांची सरबत्ती केली. त्यातच फिर्यादी गुंतला. फायनान्सचे हप्ते बंद करून इन्शुरन्सचे पैसे मिळविण्यासाठी ट्रक चोरी केल्याचा बनाव साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. इतर दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिन्ही संशयितांना गोंदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे, पोनि. रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. आशिष खांडेकर, पोउपनि. प्रमोद बोंडले, पोउपनि. राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, फुलचंद गव्हाणे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, योगेश सहाणे, चंद्रकला शडमल्लू यांनी केली आहे.