जालना : जिल्ह्यात काही दिवसांपासून चोरी-छुपे जुगाराचा खेळ सुरू आहे. जालना शहरातही मध्य वस्तीत हे प्रकार वाढले आहेत. आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जुगार, दारू विक्री सुरू असल्याचे माहिती असतानाही पोलिसांनी याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. कधीतरी एखादी कारवाई करून अवैध धंदे बंद असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे.शहरातील मध्यवस्तीत खाटीकपुरा भागात एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शनिवारी रात्री सदर बाजार पोलिसांनी छापा टाकून सोळा जुगा-यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. जाफराबाद शहरातील एका इमारतीमध्ये पोलिसांनी सात जुगा-यांना ताब्यात घेऊन सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. परतूर शहरात विशेष कृती दलाच्या कारवाईनंतरही स्थानिक पोलीस अधिका-यांनी दुर्लक्ष केल्याने कल्याण नावाचा जुगार सुरूच आहे. या जुगा-यांमुळे स्थानिक नागरिकांना त्रास वाढला आहे. जुगाराच्या आहारी जाऊन अनेकांनी आपले संसार उद्ध्वस्त केले आहेत. बदनापूर तालुक्यात अवैध जुगार व दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या भागात औरंगाबाद जिल्ह्यातील जुगार खेळणारे मोठ्या प्रमाणात येतात. काही ठिकाणी शेतांमध्ये त्याच्यासाठी खास सुविधा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अंबड, भोकरदन मध्येही जुगाराचा खेळ जोरात सुरू आहे. जुगाराबरोबरच अवैध दारू विक्रीचे प्रमाणही वाढले आहे. विशेष: शहरातील कैकाडी मोहल्ला भागात हातभट्टी दारू बनविणे व अवैध विक्री करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. हाकेच्या अंतरावर असलेल्या कदीम जालना पोलिसांना हा प्रकार माहिती असतानाही थातूरमातूर कारवाई करून वेळ मारून नेण्याचा प्रकार पोलिसांकडून सुरू आहे.------------चोरीच्या घटनाही वाढल्याशहरात चोरीचे प्रकारही वाढले आहेत. दुचाकी चोरीच्या घटना तर रोजच घडत आहेत.गुन्हे शाखेकडून चोरी व दरोड्याच्या घटनांचा तपास लावला जात असला तरी स्थानिक पोलीस घटना घडल्यानंतर केवळ गुन्हा नोंदवून घेण्यापुरते काम करत आहेत.---------------------विद्यमान नगरसेवकासह १५ जणांवर कारवाईजालन्यात मराठा बिल्डिंग परिसरात शनिवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी एका विद्यमान नगरसेवकासह तब्बल १५ जण जुगार खेळताना मिळवून आले. यामध्ये गोपाल मदनलाल भुरेवाल (रा.खाटिकपुरा) रोहिदास मनोहर गायकवाड (चंदनझिरा) गौतम पारसमल गादिया (कादराबाद), दशरथ राजाराम जाधव (मोदीखाना), रामराव रावसाहेब सराफ (हमालपुरा), गिरीश मनोहरराव शिनगारे (कादराबाद), शिवा लक्ष्मण काटकर (नळगल्ली), मनोहर रंगनाथ राऊत (मोदीखाना), जनार्दन पंढरीनाथ पिवळ (सोनलनगर), शेख सत्तार शेख गफ्फार (चंदनझिरा), दिनेश ओमप्रकाश भगत (मराठा बिल्डिंग परिसर), दीपक मोतीलाल चौधरी (गांधीनगर), घनश्याम नंदलाल भुरेवाल (मशीन हॉस्पिटल परिसर), प्रमोद महावीर प्रसाद दायमा (जवाहरबाग), राजेश मदनलाल धोका (आरपी रोड ), चंपालाल भगत (मराठा बिल्डिंग परिसर) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी एक लाख ७२ हजार ७८० रुपये रोख व जुगार साहित्य जप्त केले.
जुगारामुळे बरबाद होताहेत संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:05 AM