जालना : घरगुती वादातून एका ४२ वर्षीय इसमाने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. रमेश राम गुरूभैय्ये (४२ रा. नूतन वसाहत) असे मयताचे नाव आहे.
रमेश गुरूभैय्ये हे जिल्हा शासकीय रूग्णालयासमोरील एका नाष्टा सेंटरवर कामाला होते. सोमवारी रात्री त्यांचे मुलाशी वाद झाले होते. मुलाने स्वत:च्या हातावर ब्लेड मारल्याने ते चिंतेत होते. त्यानंतर कोणाला न सांगता ते घरातून निघून गेले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. याची माहिती कदीम जालना पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशात महाजन यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास पोलीस नाईक दाभाडे हे करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.